मुंबई : भाजप नेते मोहीत कंबोज यांना मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडियातील १०३ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी सीबीआयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट दंडाधिकारी जयवंत यादव यांनी फेटाळून लावला. इतकेच नव्हे तर याप्रकरणी पुढील तपास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज व इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची १०३ कोटी रुपयांची फसवणूक केली असा कंबोज यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली असून कंपनी आणि तिच्या संचालकांवर खटला चालवण्यासाठी पुरेशा पुराव्यांचा अभाव असल्याने सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली असून दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट (प्रकरण बंद करण्यासाठीचा अहवाल) सादर केला मात्र दंडाधिकाऱ्यांनी हा अहवाल फेटाळून लावला. तसेच याप्रकरणी पुढील तपास करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश तपास यंत्रणांना दिले.