मुंबई : मुंबईत जोरदार पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचले आहे. विशेषतः अदानी इलेक्ट्रिसिटीचे वितरण जाळे असलेल्या काही भागांत पाणी साचले आाहे. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ग्राहकांचा वीजपुरवठा बंद करावा लागला. पाणी ओसरू लागल्यावर पुरवठा सुरळीत केला. मात्र, आता पावसाचा जोर कायम राहणार असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत केंद्रीय आपत्कालीन नियंत्रण केंद्राच्या पथकांना अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून, ती २४ तास कार्यरत राहण्यासाठी सज्ज झाली आहेत.
मुंबई महापालिका व मीरा-भाईंदर महापालिकेसारख्या बाह्य प्रशासनाशी व अन्य विभागांशी पथके नियमितपणे समन्वय साधून आहेत. त्यामुळेच ग्राहकांच्या वीजपुरवठ्यात कमीत कमी अडथळा येत आहे. पाणी साचण्यासारख्या घटनांमधून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत होत आहे, असा दावा अदानी इलेक्ट्रिसिटीने केला आहे. ग्राहकांनी सुरक्षेसाठी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे. पुरवठ्यासंबंधी काही तक्रारी, आग लागणे किंवा विजेचा धक्का लागल्यास हेल्पलाइनवर किंवा केंद्रीय आपत्कालीन नियंत्रण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील विद्युत धोका
- पावसामुळे पाणी साचणे : मीटरकक्ष, विद्युत खांब, उपकेंद्र, पथ दिव्यांचे खांब
- बेकायदेशीर जोडणी घेणे (चोरी)
- ग्राहकाच्या परिसरातील खराब विद्युतरोधकासह असलेल्या बेकायदेशीर वायर / संच मांडणी ज्यांचा ग्रिल, छतावरील धातू व अन्य धातूला स्पर्श
काळजी घेणे
- इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटस्/उपकरणे साचलेल्या पाण्यापासून दूर ठेवा
- गॅझेटस्/उपकरणे पाण्यात भिजल्यास सुरू करू नका
- अशी उपकरणे सुरू करण्याआधी परवानाधारक वायरमनकडून तपासून घ्या
- बेकायदेशीर वायरद्वारे जोडणी घेऊ नका
- परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून सुयोग्य अर्थिंग असल्याची खात्री करा