मुंबई : अयोध्येतील राम जन्मभूमी विवादप्रकरणी सर्वोच्च न्यायालय उद्या सकाळी निकाल जाहीर करणार असून देशभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये उद्यापासून 11 नोव्हेंबरपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
अयोध्या प्रश्नावर स्वतंत्र कायदा बनविण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यांनी कायदा बनविला नाही. यामुळे उद्या येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे श्रेय केंद्र सरकार घेऊ शकत नाही, असे म्हटले आहे. याबाबतचे पत्रक शिवसेनेने प्रसिद्ध केले असून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली होती.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनाभाजपामध्ये वितुष्ट निर्माण झाले असून शिवसेनेनेही उघडपणे भाजपाविरोधात भुमिका घेतली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे हे पत्रक आलेले आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील गदग जिल्ह्य़ातही शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.