मुंबई : केंद्र सरकारकडून राज्याला येणाऱ्या पैशामध्ये दिरंगाई होत असल्याने आपल्या योजना लांबणीवर पडत आहेत, राज्याची आर्थिक कोंडी केली जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्राकडून वेळेत पैसा मिळाला तर मला शेतकऱ्यांना अधिक पैसे वेळेवर देता येतील, असेही ते म्हणाले. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली.
शिवसेनेच्या मुखपत्रास दिलेल्या मुलाखतीत ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार नेमकं काय करतंय हे कळले पाहिजे. ते जाणूनबुजून करताहेत असे मी म्हणत नाही पण केंद्राकडून राज्याला निधी मिळण्यात दिरंगाई होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. राज्य कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहे, व्याज भरून सरकारला दम लागतोय हे खरं आहे. हे मोठं आव्हान आहे पण ते आता स्वीकारलंय तर ते पार पाडणार. कारण आता कर्ज एवढं आहे तर त्यातून मार्ग काढावाच लागेल.
‘पैशांचं सोंग आणता येत नाही श्वेतपत्रिका म्हणा किंवा आर्थिक आढावा म्हणा ते घेण्याचं काम चालू आहे, जवळपास पूर्ण झालंय, जनतेसमोर एकदा येऊ दे लेखाजोखा म्हणजे यांनी नेमका काय कारभार केला होता हे लोकांना कळेल’ या शब्दात ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे संकेत दिले.
कर्जमाफीची योजना मार्चपासून
शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याची योजना येत्या मार्चमध्ये सुरू होईल. दोन लाखांपर्यंत पीक कर्ज असलेल्यांचा सातबारा कोरा होईल. दोन लाखांच्या वरचे जे कर्जदार आहेत आणि विशेषत: जे नियमित कर्जफेड करीत आहेत त्यांच्यासाठी लवकरच योजना आणू, असेही ते म्हणाले.
बुलेट ट्रेनबाबत जनतेसमोर जाणार
बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळेल, प्रकल्प उपयोगाचा असेल तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ मग पाहू काय करायचे ते, अशी प्रतिक्रिया ठाकरे यावेळी दिली.
मुख्यमंत्री हतबल :भाजपची टीका
राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून त्याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका प्रदेश भाजपने केली.