केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला कोरोनाविरुध्द लढण्यासाठी किमान पाच हजार कोटीचे अर्थसाहाय्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:28+5:302021-03-18T04:06:28+5:30
मुंबई : केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला कोरोनाविरुध्द लढण्यासाठी किमान पाच हजार कोटींचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना नेते व ...
मुंबई : केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला कोरोनाविरुध्द लढण्यासाठी किमान पाच हजार कोटींचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी शिवसेना नेते व उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली.
आरोग्य मंत्रालयाच्या पुरवणी मागण्यांवर शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेत विस्तृत निवेदन केले. याबाबत त्यांनी लोकमतला सविस्तर माहिती दिली.
देशात १५ अत्यावश्यक हॉस्पिटल्स व २ मोबाइल हॉस्पिटल उभारण्यात येतील, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर होणारे रस्ते अपघात लक्षात घेता खेड, रत्नागिरी, संगमेश्वर यापैकी एका ठिकाणी अत्यावश्यक हॉस्पिटल बांधण्यात यावे, अशीही विनंती त्यांनी केली.
देशात डायबेटिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरिता दररोज रक्त तपासणी घरचे घरी करण्याकरिता ग्लुकोमीटरचा वापर करावा लागतो. या ग्लुकोमीटरच्या एका स्ट्रीपची किंमत रु. २५/- आहे. गरीब रुग्णांना सदर खर्च करणे अत्यंत कठीण जाते. या ग्लुकोमीटर स्ट्रीपवरील सर्व कर रद्द करावेत, अशी मागणी कीर्तिकर यांनी केली.
देशामध्ये प्रत्येक राज्यात एक एम्स रुग्णालय उभारण्यात येते. मागील अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर येथे एम्स रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली, परंतु हिंदुस्थानची आर्थिक राजधानी मुंबई येथील लोकसंख्या, येणाऱ्या पर्यटकांची संख्या, देशभरातून औषधोपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता केंद्र शासनाचे अनेक रिक्त भूखंड मुंबई उपनगरामध्ये उपलब्ध आहेत, त्यावर तत्काळ एम्स हॉस्पिटल उभारण्याची घोषणा करून आर्थिक तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली.