मुंबईशेतकरी आंदोलनाबाबतीत केंद्र सरकारने आडमूठेपणा न दाखवता आता शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला आहे.
मुंबईत आज शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी शरद पवार हे राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं.
"पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी", असं शरद पवार म्हणाले.
९ डिसेंबरला शेतकऱ्यांसोबत पुढील बैठकदिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे. शनिवारी शेतकरी आणि सरकारमध्ये झालेली चर्चा देखील निष्फळ ठरली. त्यानंतर ९ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी जाहीर केलं आहे. त्याआधी ८ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.