केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, मुंबईच्या पावसाची दिल्लीत पंतप्रधान मोदींकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 06:47 PM2017-08-29T18:47:56+5:302017-08-29T20:18:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यातील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे
मुंबई, दि. 29 - मुंबईत सकाळपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राज्यातील पावसाची दखल घेतली असून ट्विट करत केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे की, 'महाराष्ट्रातील काही भागात पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करेल'.
Centre assures all possible support to the Government of Maharashtra in mitigating the situation due to heavy rains in parts of the state.
— Narendra Modi (@narendramodi) August 29, 2017
मुंबईतील पावसाचा जोर वाढत चालला असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन घेतला परिस्थितीचा आढावा घेतला आहे. 'मी महापालिका आपतकालीन विभागाशी चर्चा केली असून मुंबई पोलिसांशी हॉटलाईनवरुन बोललो आहे. मंत्रालयातील कर्मचा-यांना लवकरात लवकर कामावरुन घरी जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगितलं आहे', अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महपालिकेची कंट्रोल रूम सक्रिय असून, पाऊस / शहराशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा असं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहनही केलं आहे. 'मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिशय आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा', असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 'मुंबईत गेल्या १ तासामध्ये ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित आहे', असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई आणि उपनगराला सकाळपासून पावसाने झोडपलं असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. दरम्यान मुबईकरांसाठी नेहमी धावणा-या डबेवाल्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबेवाले जागोजागी अडकुन पडले आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचं स्वरुप आलं आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, कर्मचा-यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे.