मुंबई - विमानतळाच्या सरकरी जागेवरील झोपडपट्टी वासीयांना हक्काची घरे देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक आहे, असे प्रतिपादान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रात्री 23 व्या पार्ले महोत्सवात केले. येथील स्थानिक भाजप आमदार अँड पराग अळवणी आयोजित पार्ले महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाचे वामन मंगेश दुभाषी मैदानावरील शानदार सोहळ्यात मशाल प्रज्वलित करून त्यांनी उद्घाटन केले.
पार्ले महोत्सवाचे मुख्य आयोजक व आमदार अँड पराग अळवणी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्टीवसीयांचे पुनर्वसन आणि फनेल झोनचा प्रश्न सोडवण्याची मागणी फडणवीस यांच्या कडे केली होती.त्यांच्या भाषणाचा धागा पकडून विमानतळ प्राधिकरणाची केंद्र सरकारची जमीन उपलब्ध करून झोपडपट्टीवासीयांसाठी घरे बांधून त्यांना हक्काची घरे द्यायची हा प्रस्ताव अंतिम टप्यात असून हा प्रस्ताव केंद्रीय हवाई मंत्रालयाकडे पोहचला असून त्यांच्या बरोबर बैठक देखिल झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
फनेल झोन प्रश्नाबद्धल गेली 7-8 वर्षे आमदार पराग अळवणी हे पाठपुरावा करत असून हा प्रस्ताव अंतिम टप्यात आला आहे.3-4 प्रस्तावांपैकी कोणता प्रस्ताव फायद्याचा-तोट्याचा आहे यावर निर्णय अपेक्षित असूनमुख्यमंत्री देखिल याबद्दल सकारत्मक आहेत असे फडणवीस यांनी सांगितले.
आमदार अँड पराग अळवणी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांचा उपरणे, भगवत गीता आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.
पार्ले महोत्सवाने अनेकांना व्यासपीठ दिले, त्यातून उत्तम संघटक आणि नेतृत्व करणाऱ्यांबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि कलाकार निर्माण केले, त्यांनी राज्याचे आणि देशाचे नाव मोठे केले, त्यामुळेच या महोत्सवात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे, असे विचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले.
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे, मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती, खाद्य संस्कृती आणि कलाकार यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला. पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आपल्या प्रास्ताविकात बोलताना आमदार पराग अळवणी यांनी सांगितले की, पार्लेकरांनी गेल्या २३ वर्षांत या महोत्सवाला भरभरून दिले, त्यामुळेच आतापर्यंत ३.५ लाख स्पर्धकांनी यात भाग घेतला. यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले. त्यामुळे आता हा महोत्सव ऑटो मोडवर आहे, असे म्हणता येईल. इथले स्पर्धक जागतिक स्तरावर नावलौकिक करत आहेत, ही आनंदाची बाब आहे.
यावेळी खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.तर यावेळी मंचकावर सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, पार्ले टिळक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गानू, प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, प्रसिद्ध भूलतज्ञ अलका मांडके,अभिनेत्री सुभाष चंद्रन, कूपोषण टास्क फोर्स निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक सावंत,अभिनेते शैलेश दातार,माजी नगरसेविका अँड.ज्योती अळवणी, जिल्हा अध्यक्ष सुषम सावंत आदी मान्यवर यावेळी मंचकावर उपस्थित होते.