मुंबईतील वसतिगृहांसाठी सेंट्रल किचन
By admin | Published: April 20, 2017 04:46 AM2017-04-20T04:46:41+5:302017-04-20T04:46:41+5:30
आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाच्या....
मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर सामाजिक न्याय विभागाच्या मुंबईतील सात वसतिगृहात प्रायोगिक तत्त्वावर सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांसाठी ‘सेंट्रल किचन’ स्थापन करण्यातबाबत मंत्री बडोले यांच्या अध्यतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह सामाजिक न्याय विभाग आणि समाजकल्याणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. टाटा ट्रस्टच्या सेंट्रल किचनमधून आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा केला जातो. याच धर्तीवर सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल किचनमधून भोजन पुरवठा करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मुंबईत सामाजिक न्याय विभागाची सात वसतिगृहे आहेत. प्रायोगिक तत्त्वावर येथील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून भोजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘अक्षयपात्र’ या संस्थेच्या सहकार्याने सेंट्रल किचन उभारण्यात येईल. सर्वच वसतिगृहांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आहे. विभागाच्या अखत्यारीतील वसतिगृहातील मेनूप्रमाणे अक्षयपात्र संस्था भोजन बनविणार आहे. या भोजनाचा निम्मा खर्च ‘अक्षयपात्र’ स्वत: करेल. मुंबईतील ४० किलोमीटरच्या आतील वसतिगृहात अन्नपदार्थ पोहचविण्याचे कामही संस्था स्वखर्चाने करणार असून स्वच्छ भारत अभियान मोहिमेंतर्गत राज्यभरातील ३५ हजार विद्यार्थ्यांना कंपन्यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून मोफत हॅन्डवॉश देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)