Join us

येत्या ४८ तासांसाठी मध्य महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा इशारा; मुंबईत मात्र घामाघूम करणारा उन्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वाढत्या उन्हाने कहर केला असतानाच दुसरीकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात वाढत्या उन्हाने कहर केला असतानाच दुसरीकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागासाठी हवामान खात्याने येत्या ४८ तासांकरिता पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार शनिवारी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर येथे, तर रविवारी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे आणि अहमदनगर येथे पावसाची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येत असून, वाढती उष्णता मुंबईकरांना ताप देत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि लगतच्या भागावर असलेला चक्रवात आता विदर्भ आणि लगतच्या भागावर आहे. गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे. कोकणातील काही भागांत कमाल तापमानात काहीअंशी घट झाली असली तरी विदर्भात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. कोकणालाही येत्या ४८ तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांसाठी हे बदल तापदायक ठरत असून, मार्च महिन्यात हवामानात असे बदल आणखी काही काळ नोंदविण्यात येतील, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

.......................