मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:23 AM2023-07-22T11:23:07+5:302023-07-22T11:23:33+5:30
प्रवाशांनी नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेने केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सतत पडणाऱ्या पावसामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून उपनगरीय सेवांचा बोजवारा उडाला असतानाच रुळांची देखभाल दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी रविवार, २३ जुलैला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर दिवसभरात मेगाब्लॉक नसेल. ऐन पावसाळ्यात घेण्यात येणाऱ्या मेगाब्लाॅकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांनी नियोजन करण्याचे आवाहन रेल्वेने केले.
पश्चिम रेल्वे
कुठे? : वसई रोड - विरार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर
कधी? : रात्री १२:३० ते पहाटे ४:०० वाजेपर्यंत
परिणाम काय? : ब्लॉक कालावधीत वसई रोड ते विरार स्थानकादरम्यान धिम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तर ब्लॉक कालावधीत काही लोकल सेवा रद्द असणार आहेत.
हार्बर रेल्वे
कुठे? : पनवेल - वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी? ११:०५ ते ४:०५ वाजेपर्यंत
परिणाम काय? : ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे. पनवेल येथून सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलकरिता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपरदरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
मध्य रेल्वे
कुठे? : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी? : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत
परिणाम काय? : सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.