'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 08:49 AM2021-11-15T08:49:09+5:302021-11-15T08:49:17+5:30

बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

Central Minister Nitin Gadkari has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare | 'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

'तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले'; नितीन गडकरींनी वाहिली बाबासाहेबांना श्रद्धांजली

googlenewsNext

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले आहे. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांनी आज सकाळी 5.07 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे. अलीकडेच बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभरी पर्दापण केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधानानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. तसेच एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते. आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता. आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआची लागण झाल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली होती. त्यानंतर, सकाळी रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे 5.17 मिनिटांनी निधन झाले. त्यांचे पार्थीव सकाळी 7.30 वाजता पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील, असे या पत्रकातून कळविण्यात आले आहे.  

Web Title: Central Minister Nitin Gadkari has paid tributes to Shivshahir Babasaheb Purandare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.