Join us

पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर ‘केंद्रीय देखरेख प्रणाली’

By admin | Published: January 10, 2017 7:12 AM

रेल्वे स्थानकांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने ‘केंद्रीय

मुंबई : रेल्वे स्थानकांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालता यावा यासाठी पश्चिम रेल्वेने ‘केंद्रीय देखरेख प्रणाली’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीअंतर्गत सात स्थानकांवर ५०० सीसीटीव्ही बसविण्यात येतील आणि त्याचा नियंत्रण कक्ष मुंबई सेंट्रल स्थानकात राहील, अशी माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफचे विशेष महानिरीक्षक उदय शुक्ला यांनी दिली. केंद्र सरकारच्या निर्भया निधीद्वारे देशभरातील रेल्वे स्थानकांवर उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यासाठी रेल्वेला एक हजार कोटी रुपयेही मंजूर झाले असून यात पश्चिम रेल्वेच्या ५० स्थानकांवर  कॅमेरे बसविण्यात येतील. ५० स्थानकांवर जवळपास १ हजार २३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त पश्चिम रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्हींची यंत्रणा असणारी देखरेख प्रणाली उभारण्यासाठी आणखी ३० कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला  आहे. या प्रणालीअंतर्गत चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, बोरीवली, विरार स्थानकात ५०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्यात  येतील, अशी माहिती उदय शुक्ला यांनी दिली. सीसीटीव्ही बसविण्यासाठी व ती यंत्रणा हाताळण्यासाठी लागणारा कक्ष उभारण्यासाठी हा निधी खर्च होईल. मुंंबई सेंट्रल येथे त्याचा नियंत्रण कक्ष असणार असून प्रणाली ‘आयपीवर’ आधारित असेल, असे त्यांनी सांगितले. लवकरच ही प्रणाली बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिला डब्यातही सीसीटीव्ही बसविण्यात येत असून आतापर्यंत सात लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. एकूण ५0 डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन असून उर्वरित डब्यात मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)