Join us  

शिवसेना भवनजवळच एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय; वाचा काय असेल पत्ता? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 10:58 AM

शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती.

मुंबई - खरी शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित असतानाच दादरच्या शिवसेना भवनाजवळच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय लवकरच उघडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे गटाकडून जागेची चाचपणी करण्यात येत होती. सुरुवातीला शिवसेना भवनावरच शिंदे गट दावा करणार असं बोललं जात होते. परंतु त्यानंतर शिंदे गटाने दुसरीकडे जागा शोधण्यास सुरूवात केली. 

शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती. त्यातील एक जागा निश्चित झाल्याचं समोर आले आहे. शिवसेना भवनापासून काही अंतरावरच वास्तू सेंट्रल नावाच्या इमारतीत २ मजल्यावर शिंदे गटाचं कार्यालय सुरू होऊ शकतं. शिवसेना भवन आणि या इमारतीत ५०० मीटर अंतर आहे. दादर, ठाणे भागात शिंदे गटाचं मध्यवर्ती कार्यालय उघडलं जाईल असं शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सांगितले होते. 

त्यानंतर आता शिंदे गटाचं कार्यालय दादरच्या पश्चिम भागात वास्तू सेंट्रलमध्ये उघडण्याची शक्यता आहे. या इमारतीत २ मजले भाड्याने घेण्यात येतील. या इमारतीच्याजवळ कोहिनूर मिलची जागा आणि शिवसेना भवन आहे. मध्यवर्ती कार्यालयात राज्यभरातून शिंदे गटाचे पदाधिकारी याठिकाणी येऊ शकतील. शिंदे गटाची रणनीती ठरवण्यासाठी बैठका या कार्यालयात होतील. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु असताना दुसरीकडे शिवसेना भवनाजवळच शिंदे गटाने कार्यालय सुरू करण्याची रणनीती आखली आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपा एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यात शिंदे गटाकडून मुंबईत विशेष लक्ष देण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व मुंबईत कमी प्रमाणात आहे. मात्र मुंबईतील प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, दिलीप लांडे, सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर हे आमदार आणि राहुल शेवाळे खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांच्या माध्यमातून शिंदे मुंबईतील नगरसेवकांना गळ घालून उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. 

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउद्धव ठाकरे