Join us

३२० एकरावरील सेंट्रल पार्कमुळे कोस्टल रोड परिसर बहरणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 10:03 AM

एक मार्ग सुरू होण्याचे संकेत.

मुंबई : कोस्टल रोडलगत ३२० एकर जागेत भव्य सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावून जागतिक दर्जाला साजेसे असे पार्क उभारले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अंतिम टप्प्यात असलेल्या कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. 

मरीन ड्राइव्ह ते वरळी असा प्रवास करताना मुख्यमंत्र्यांनी प्रगतिपथावर असलेल्या कामांचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यामुळे कोस्टल रोडची एक मार्गिका सुरू होईल, असे संकेत मिळाले असून नऊ मार्च रोजी लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, याबाबत अद्याप पालिका स्तरावर अनिश्चितता आहे. याच महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने लोकार्पण कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात कोस्टल रोडच्या तीन मार्गिकेची एक बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असे बारा तास सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि या मार्गाला वरळी-वांद्रे आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. कोस्टलरोडच्या एका मार्गिकेचे लोकार्पण फेब्रुवारी महिन्यात होईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले  होते. मात्र, कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा मुहूर्त साधता आला नाही. 

लोकार्पण करणार कोण?

मात्र कोस्टल रोडच्या मार्गिकेचे काम पूर्ण  झाले नसल्याने पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करता आले नाही. आता पंतप्रधान मुंबईत येण्याची शक्यता नाही. त्यामुळे बहुधा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल, अशी शक्यता आहे. अथवा पंतप्रधान व्हर्च्युअल माध्यमातून उद्घाटन करू शकतात, अशी दुसरी शक्यता आहे.  मात्र या दोन्हीपैकी नेमके काय होणार आहे, याविषयी गुरुवारी तरी पालिका स्तरावर स्पष्टता नव्हती.

टॅग्स :मुंबईएकनाथ शिंदे