मुंबई - ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी-कल्याण दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था असलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास करणं त्रासदायक आहे. गर्दीच्या वेळेत अशाप्रकारे तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो.
मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अंबरनाथ ते कर्जत, खोपोली दरम्यान शटल सेवा सुरु करण्यात आली आहे तर कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकावरुन विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहेत.
दर आठवड्याला मेगाब्लॉक घेऊनही रेल्वेच्या समस्या काही सुटत नाही. गेल्या काही आठवड्यात अनेकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. पावसाच्या वेळी मध्य रेल्वेवरील सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचून बऱ्याचदा मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होते.