ब्लॉक, वाहतूककोंडी आणि हाल; ठाणे स्थानकात फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 09:46 AM2024-06-01T09:46:22+5:302024-06-01T09:47:20+5:30

कर्जत-कसाऱ्याहून येणाऱ्या लोकल तुडुंब.

central railway 63 hour block traffic jams and problems expansion of the platform at thane station is underway in mumbai  | ब्लॉक, वाहतूककोंडी आणि हाल; ठाणे स्थानकात फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू 

ब्लॉक, वाहतूककोंडी आणि हाल; ठाणे स्थानकात फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू 

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ च्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या ‘ब्लॉक’मुळे लोकल प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले. सकाळी कार्यालयीन गर्दीच्या वेळी कर्जत, कसाऱ्याहून मुंबईत येणाऱ्या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरून येत होत्या. बहुतांश रेल्वे स्थानकांतील इंडिकेटरवर दर्शविलेली लोकलची वेळ आणि प्रत्यक्ष लोकल आल्याची वेळ, यात जमीन-आसमानाचा फरक होता. त्यामुळे फलाटांवर प्रवासी ताटकळलेले होते. 

मध्य रेल्वेने शुक्रवारच्या ब्लॉकसाठी १६१ लोकल फेऱ्या रद्द करताना प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठीच प्रवास करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास परवानगी द्यावी, असे सुचविले होते. दुसरीकडे ‘ब्लॉक’ला पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी आणि बेस्टनेही अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्कूल बसनेही सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य दिले होते. पर्यायी वाहतूक व्यवस्था असतानाही प्रवाशांनी लोकलला प्राधान्य दिल्याने त्यांचे हाल झाले.

कर्जत, कसारा, पनवेल येथून मुंबईत येणाऱ्या लोकलला सकाळी आणि दुपारी गर्दी कायम होती. दुपारी २ ते ४ या काळात लोकलला गर्दी कमी असली तरी या काळात कुटुंबासह बाहेर पडलेल्या प्रवाशांना ‘ब्लॉक’चा फटका बसला.

१) पहाटेपासून मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली. 

२)  दिवसभर लोकल सुमारे ३० मिनिटे विलंबाने धावत होत्या. 

३) विलंबाने धावणाऱ्या लोकल आणि उन्हामुळे प्रवासी त्रस्त झाले होते.

४) अनेक खासगी कंपन्यांच्या कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती.

५) दुपारी रेल्वे स्थानकांत प्रवाशांची कमी गर्दी होती.

६) ‘ब्लॉक’ची कामे सुरू असल्याने डोंबिवली, कल्याणदरम्यान लोकल एकामागे एक थांबल्या होत्या.

७) सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड स्थानकांत तुरळक गर्दी होती.

८) हार्बरवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या.

इंडिकेटरवर एक, तर फलाटात दुसरीच गाडी-

कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वर सीएसएमटी येथे जाण्यासाठी इंडिकेटरवर दुपारी १:३८ वाजताची लोकल लावण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात ती लोकल दुपारी २:५९ वाजता फलाटावर आली. त्यानंतर दुपारी २:५४ वाजताची सीएसएमटी लोकल लावण्यात आली. प्रत्यक्षात मात्र फलाटावर एसी लोकल दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांनानंतर मागून येणाऱ्या लोकलची वाट बघावी लागली.

पश्चिम रेल्वेवर नामुष्की-

१) मध्य रेल्वेवर मोठा ‘ब्लॉक’ असल्याने पश्चिम रेल्वेवर ‘ब्लॉक’ घेऊ नये, अशी विनंती मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वे प्रशासनाला केली होती. 

२) तरीही शुक्रवारी सायंकाळी पश्चिम रेल्वेकडून ‘जम्बो ब्लाॅक’ जाहीर करण्यात आला. 

३) या ‘ब्लॉक’मुळे प्रवाशांची अक्षरश: दैना उडणार हे लक्षात आल्यानंतर काही काळाने पश्चिम रेल्वेवर ‘ब्लॉक’ मागे घेण्याची नामुष्की ओढावली.

दादरला उतरा आणि या...

सीएसएमटीवरील ‘ब्लॉक’मुळे शनिवार, रविवारी लोकल वडाळा आणि भायखळ्यापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे कर्जत, कसारा आणि पनवेल येथून येणाऱ्या प्रवाशांना दादरला उतरून पश्चिम रेल्वे मार्गावरून चर्चगेट गाठत फोर्टला यावे लागणार आहे. 
प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून बेस्ट आणि एसटीकडून जादा बस सोडण्यात येणार असल्या तरी प्रवाशांचा आकडा वाढला तर या सेवा तोकड्या पडण्याची शक्यता आहे.

 ही वाहतूक फायदेशीर -

१) ‘ब्लॉक’मुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून ब्लॉक कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

२) मुंबई महानगर परीक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस ही परवानगी असणार आहे.

Web Title: central railway 63 hour block traffic jams and problems expansion of the platform at thane station is underway in mumbai 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.