मुंबई : ऊर्जा खप, इंधन वापर, ऊर्जा ऑडिट, पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन प्रमाणपत्र, वनीकरण आणि पर्यावरणाशी संबंधित इतर कामांमधील प्रगतीमुळे मध्य रेल्वेने सन २०१९-२०२० साठी रेल्वेमंत्र्यांची प्रतिष्ठित ‘पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड’ जिंकली. महाप्रबंधक संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य यांत्रिकी अभियंता ए. के. गुप्ता आणि ज्यांनी हे काम साध्य करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मध्य रेल्वेने नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प, स्वच्छता जागरूकता मोहीम, राष्ट्रीय हरित लवादच्या निर्देशांचे आणि स्वच्छ गाड्या व स्थानकांचे पालन करण्यात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. जलसंधारणासाठी मध्य रेल्वेवर रेन वॉटर हार्वेस्टिंग १२८ ठिकाणी केली जात आहे, १३ कृत्रिम तलाव तयार केले आहेत, जुन्या जलसंपदाचे पुनर्भरण केले जात आहे आणि पुनर्वापर केलेले पाणी प्लॅटफॉर्म धुण्यासाठी आणि बागकामासाठी वापरले जाते. मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी २० कंपोस्टिंग प्लांट्स बसविण्यात आले. एकूण ६.७४ लाख रोपट्यांची लागवड ट्रॅकच्या बाजूला आणि १९४ हेक्टर क्षेत्रावर मोकळ्या जमिनीवर करण्यात आली. भुसावळ, सोलापूर आणि चिंकी हिलमध्ये दाट जंगल तयार करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेने विविध स्थानकांवर उत्तम प्रकाशासाठी सोलर स्ट्रीट लाइट, सौर झाडे, सौर छत्री आणि सौर छप्पर टॉप पॅनेलिंग, सौर वॉटर कूलर, सौर ३ एचपी पंप आणि सौर नळ्या बसविल्या आहेत. मध्य रेल्वेमध्ये सर्व स्थानके, सेवा इमारती आणि कोचमध्ये १००% एलईडी लाइट फिटिंगचे काम पूर्ण झाले आहे. ६० वेगवेगळ्या स्थानकांवर प्लास्टिक बॉटली क्रशिंग मशीन्स स्थापित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात २१ हाय व्हॉल्यूम लो स्पीड एनर्जी इफिशिएंट फॅन्स बसविलेले आहेत. सन २०३० पर्यंत भारतीय रेल्वेत निव्वळ झीरो कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी मध्य रेल्वेने वेगवान चालना दिली आहे.