Join us

फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत १०० कोटींची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:50 AM

मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून मागील सहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून मागील सहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.मध्य रेल्वे मार्गावर १ एप्रिल, २०१९ पासून ते २४ सप्टेंबर, २०१९ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकूण १९ लाख १५ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली. त्यांच्याकडून १०० कोटी २९ लाख रुपये दंडाची वसुली मध्य रेल्वे प्रशासनाने केली आहे.मागील वर्षी याच कालावधीत या संदर्भात १७ लाख ४२ हजार प्रकरणे नोंदविण्यात आली होती. यातून ८७ कोटी ९८ लाख रुपये दंडवसुली झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी फुकट्यांची संख्या ९.९२ टक्के आणि दंडाची रक्कम १३.९९ टक्के वाढली आहे.१ एप्रिल ते २४ एप्रिल या कालावधीत मुंबईतील ८ लाख १३ हजार प्रकरणांमध्ये ४१ कोटी २१ लाख रुपये, भुसावळमधून २ लाख ८३ हजार प्रकरणांमध्ये १७ कोटी, नागपूरमधून २ लाख ३१ हजार प्रकरणांतून १० लाख ४६ हजार, पुण्यामधून १ लाख ७२ हजार प्रकरणांतून ८ कोटी ७९ रुपये, तर सोलापूरमधून २ लाख ७० हजार प्रकरणांतून १२ कोटी ९५ लाख रुपये वसूल करण्यात आले. प्रत्येक ठिकाणाच्या मुख्यालय स्क्वॉडमधून १ लाख ४५ हजार प्रकरणांतून ९ कोटी ८८ लाख रुपये दंडवसुली झाली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी तिकीट तपासणी करताना विनातिकीट प्रवाशांसह बनावट ६ रेल्वे कर्मचारी, बनावट ४ पोलीस कर्मचारी आणि १ बनावट कॅटरिंग कर्मचाºयाला ताब्यात घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :मध्य रेल्वे