मुंबई: रेल्वे स्थानकावर मिळणाऱ्या लिंबू सरबताच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आली. रेल्वे स्थानकांवरील लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टा यांच्या खुल्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. कुर्ला स्थानकावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. लिंबू सरबत तयार करताना होणारा अस्वच्छ पाण्याचा वापर यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनानं लिंबू सरबत, ऑरेंज ज्यूस, काला खट्टाच्या खुल्या विक्रीवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकांवर ज्यूस विकण्यासाठी 2013 मध्ये परवानगी देण्यात आली होती. या ज्युसचा दर्जा चांगला असावा, स्वच्छता राखली जावी, अशा अटी त्यावेळी घालण्यात आल्या होत्या. मात्र या अटींचं अगदी सर्रास उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच मध्य रेल्वे प्रशासनानं अशा प्रकारच्या ज्युस विक्रीवर बंदी घालण्याचं पाऊल उचललं.
काय आहे प्रकरण?कुर्ला स्थानकावर छप्पर बसवण्याचे काम सुरू असल्यानं पादचारी पुलावरून स्थानकावरील सर्व हालचाली सहजपणे दिसून येतात. त्यामुळे लिंबू सरबतवाला कशाप्रकारे लिंबू सरबत तयार करतो, हे दिसून आलं. याचा व्हिडीओ एका प्रवाशानं चित्रीत केला होता. लिंबू सरबत तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यानेच हात धुतले जात असल्याचं यात अगदी स्पष्टपणे लक्षात येत होतं. अस्वच्छ पाण्यापासून कशाप्रकारे लिंबू सरबत तयार करण्यात येतं, हे व्हिडीओत कैद झालं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अतिशय वेगानं व्हायरल झाला होता.