महामुंबईकरांना मध्य रेल्वेने केले ‘ब्लॉक’; रविवारी निम्म्या लोकल फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 09:26 AM2023-12-11T09:26:23+5:302023-12-11T09:27:05+5:30
मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड लोकल गर्दीचा सामान करावा लागला. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
मुंबई : मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड लोकल गर्दीचा सामान करावा लागला. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. ब्लॉक संपूनदेखील रात्री उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता. त्यामुळे ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात आलेल्या होत्या. परिणामी धीम्या मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला होता.
याकाळात धीम्या लोकल फेऱ्या सुमारे १० ते १५ मिनिटे आणि जलद लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते.
सुटीच्या वेळापत्रकामुळे लोकल फेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागला आहे, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती.
यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली.
मात्र ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्यामध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रचंड हाल झाले.