मुंबई : प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या सोयिसुविधांसाठी मध्य रेल्वेकडून दादर स्थानकात आयएसएस (इंटीग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम) यंत्रणेअंतर्गत ११८ सीसटिव्हींचा शुभारंभ करण्यात आला. तर ठाणे स्थानकाबाहेर वाहनांसाठी दुमजली पार्किंगचे भूमिपूजन करण्यात आले. या दोन महत्वाच्या सेवांबरोबरच दिवा आणि विठ्ठलवाडी स्थानकात पादचारी पुलांचेही उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम अंतर्गत हायटेक असे सीसीटिव्ही गर्दीच्या स्थानकांवर बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यात सीएसटी, दादर, कुर्ला, एलटीटी, ठाणे आणि कल्याण स्थानकांचा समावेश असून यातील सीएसटी, कुर्ला आणि ठाणे स्थानकात सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यानंतर दादर स्थानकात हे सीसीटिव्ही बसवण्याचे काम सुरु होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यात आला. दादर स्थानकात ११८ सीसीटिव्ही बसवण्यात आले असून एकूण या प्रकल्पासाठी खर्च जवळपास २२ कोटी ३ लाख झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ठाणे स्थानक हे मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात गर्दीचे आणि व्यस्त असणारे स्थानक मानले जाते. या स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात वाहनांची पार्किंग होते. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच सध्या असणाऱ्या खासगी पार्किंग चालवणाऱ्यांकडून वाहन चालकांची लूटही केली जात असल्याने स्थानकाबाहेरच दुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला. (प्रतिनिधी)दिवा स्थानकातील पादचारी पुलाचा विस्तार-दिवा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर असणाऱ्या पादचारी पुलाचा रेल्वेकडून विस्तार करण्यात आला. यासाठी तब्बल ७५ लाख रुपये खर्च आला. विठ्ठलवाडी स्थानकात नवा पादचारी पूल-विठ्ठलवाडी स्थानकात कल्याण दिशेला नवा पादचारी पुल उभारण्यात आला. या पुलाचे रेल्वे मंत्र्यांकडून शुभारंभ करण्यात आला. ४.८८ मीटर रुंद आणि ३0 मीटर लांबीच्या असणाऱ्या या पुलासाठी दीड कोटी रुपयांचा खर्च आल्याचे सांगण्यात आले. २0१३-२0१४ मध्ये प्रवासी सेवा सुविधांतर्गत दुमजली पार्किग मंजुर करण्यात आले आहे. त्यानंतर आता या प्रकल्पाच्या कामाला खरे स्वरुप देण्यात येत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. दुमजली पार्किंसाठी एकूण साडे आठ कोटी रुपये खर्च येणार असून २0१६ सालच्या अखेरपर्यंत काम पूर्ण होईल.
मध्य रेल्वेचा चौकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2015 1:23 AM