Join us

स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वेचा स्वच्छता रथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 7:56 PM

पावसाळ्यात अनेकवेळा कचरा, घाण यामुळे रेल्वे परिसर अस्वच्छ बनतो. पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे. 

 

मुंबई : पावसाळ्यात अनेकवेळा कचरा, घाण यामुळे रेल्वे परिसर अस्वच्छ बनतो. पावसाळ्यात रेल्वे मार्ग स्वच्छ करण्यासाठी आणि सर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेचा 'स्वछता रथ' धावत आहे.  रेल्वे स्थानक आणि रेल्वे रेल्वे रुळांलगतच्या भागाची स्वच्छता  करण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने विविध उपाययोजना करते. रेल्वे रूळ स्वच्छ ठेवण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान कचरा काढण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी 'स्वच्छता रथ' धावत आहे.

पावसाळ्यात रेल्वे रुळांच्या आजूबाजूला टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे गटारे तुंबतात. परिणामी, रेल्वे मार्गावर पाणी साचले जाते. त्यामुळे गटारातील घाण काढण्यासाठी स्वच्छता रथ मध्यरात्री धावतो. मात्र लॉकडाऊन काळात हा रथ दिवसाही चालविण्यात आला. घाण आणि कचरा साफ केल्यावर गोणींत भरले जाते. त्यानंतर 'स्वच्छता रथ' स्पेशल ट्रेनमध्ये या गोणी भरल्या जातात. मध्य रेल्वे मार्गावर आणि हार्बर रेल्वे मार्गावर प्रत्येकी एक याप्रमाणे मध्य रेल्वे प्रशासन दोन ईएमयू 'स्वच्छता रथ' गाड्या चालवत आहे. आवश्यकता असल्यास जेसीबी मशीनच्या सहाय्याने घाण, कचरा काढला जातो. तेव्हा, ३ बीआरएन (फ्लॅट प्रकारचे वॅगन) चालविले जातात, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.  सीएसएमटी ते कल्याण या रेल्वे मार्गादरम्यान पारसिक बोगद्याजवळील दोन्ही बाजूंच्या झोपडपट्ट्या, डोंबिवली स्थानकाच्या धीम्या मार्गाजवळील भाग, विक्रोळी, माटुंगा- शीव दरम्यान धोबी घाट व धारावी, सीएसएमटी- मस्जिद-सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान 'स्वच्छता रथ'  मुख्यतः वापरले जाते. तर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान वडाळा आणि किंग्ज सर्कल, माहीम, चेंबूर आणि मानखुर्द दरम्यान जीटीबी नगर आणि रावली जंक्शन येथेही स्वच्छता रथ' वापरले जाते. रेल्वे रुळांवर कचरा टाकू नये, असे नागरिकांना मध्य रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबई