मुंबई : स्वच्छता राखण्यासाठी रेल्वेने केवळ स्थानक आणि त्याच्या आसपासच नाही तर रेल्वे रुळांवरही सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत. मध्य रेल्वेने वर्ष २०२०-२१ दरम्यान उपनगरीय विभागातील रुळांवरून १.७ लाख घन मीटर कचरा साफ केला आहे.
मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरीय नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे, ज्यामध्ये ३३६ मार्ग किलोमीटरचे चार उपनगरीय मार्ग आहेत.
शहरातील ट्रॅक स्वच्छ ठेवण्यासाठी, मध्य रेल्वे ''स्वच्छता रथ'' चालवून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान हार्बर मार्गावरील गाळ आणि कचरा गोळा तसेच साफ केला जातो.
रुळांच्या बाजूला कचरा आणि घाण टाकली जाते, ज्यामुळे रुळ खराब होतातच तसेच त्याखाली असलेले ड्रेनेजदेखील अडवले जातात, ज्यामुळे पावसाळ्यात रुळांवर पाणी साचते. हे ''स्वच्छता रथ'' फक्त मध्यरात्रीच चालत असतात. साफ केलेला कचरा आणि घाण गोण्यांमध्ये पॅक केला जातो जो नंतर ''स्वच्छता रथ'' (स्पेशल ट्रेन) मध्ये चढवला जातो. ०७ स्वच्छता रथ मध्य रेल्वेच्या उपनगरी विभागात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, पोक्लेनदेखील वापरले जातात, आवश्यकतेनुसार जेसीबी मशीनच्या मदतीने कचरा काढला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण दरम्यान असलेल्या झोपड्या/ झोपडपट्ट्या दोन्ही बाजूंच्या पारसिक बोगद्यावर, डोंबिवली स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टोकाकडे धीम्या लाइनच्या बाजूला, विक्रोळी, माटुंगा - शीव दरम्यान धोबी घाट, धारावी आणि दरम्यानच्या पट्ट्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मशीद - सँडहर्स्ट रोड तसेच हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द दरम्यान, वडाळा आणि किंग्ज सर्कल दरम्यान रावळी जंक्शन येथे, माहीम, चेंबूर आणि मानखुर्द दरम्यान, गुरू तेगबहादूर नगर आणि रावळी सेक्शन दरम्यान प्रामुख्याने स्वच्छता रथ वापरला गेला आहे.