अत्यावश्यक सेवेसाठीच्या लोकलमध्ये घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना मरेचा दणका, लाखोंच्या दंडाची वसुली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:01 PM2020-08-21T23:01:26+5:302020-08-21T23:04:03+5:30
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या मोजक्या फेऱ्या चालवल्या जात आहेत.
मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या मोजक्या फेऱ्या चालवल्या जात आहेत. दरम्यान, असे असले तरी काही प्रवासी अवैधरीत्या आणि बनवट ओळखपत्रांच्या मदतीने लोकल प्रवास करताना दिसून येत असून, अशा प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने कठोर कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांत केवळ अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या १३०० प्रवाशांवर तसेच बनावट ओळखपत्र दाखवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. या प्रवाशांवर जबर दंडात्मक कारवाई करत मध्य रेल्वेने सुमारे साडे तीन लाखांच्या दंडाची वसुली केली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कुठल्याही प्रवाशांनी रेल्वेमधून प्रवास करू नये, त्यामुळे गर्दी वाढत आहे, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. देशात कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्या्च्या उत्तरार्धापासून मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे.