लोकलच्या वक्तशीरपणावर मध्य रेल्वेचा ‘पडदा’!; प्रवाशांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 01:09 AM2019-09-12T01:09:15+5:302019-09-12T01:09:29+5:30
सीएसएमटी येथील इंडिकेटर हटविला
मुंबई : मुसळधार पाऊस, रेल्वे मार्गावर होणारा दररोजचा बिघाड यामुळे लोकलचा वक्तशीरपणा ढासळला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील लोकलच्या वक्तशीरपणा दाखविणारे इंडिकेटर रेल्वे प्रशासनाकडून काढले आहे. त्यामुळे प्रवाशांना वक्तशीरपणाची मिळणाऱ्या माहितीवर मध्य रेल्वेकडून पडदा टाकत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
मध्य रेल्वे मार्गावरील पकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने वक्तशीरपणाची गाडीही रुळावरून घसरली आहे. इंडिकेटरद्वारे आदल्या दिवसाच्या सकाळ आणि सायंकाळ लोकलसह आजच्या सकाळचा वक्तशीरपणा दाखविण्यात येत असत. प्रत्यक्षात गाडीची सुटण्याची वेळ आणि शेवटच्या स्थानकावर पोहोचण्याची वेळ यावर हा वक्तशीरपणा ठरतो. प्रत्यक्षात मधल्या स्थानकावर प्रवासी ताटकळत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वक्तशीरपणाची कोणतीही माहिती मिळू नये, यासाठी इंडिकेटर काढण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
कामामुळे इंडिकेटर काढला
सीएसएमटी स्थानकावर सध्या सुरू असलेल्या कामामुळे इंडिकेटर काढण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात
आली.
प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा
मध्य रेल्वेचा वक्तशीरपणाची टक्केवारी खालावलेली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासानाने वक्तशीरपणाचा इंडिकेटर हटविण्यात धन्यता मानली आहे. यापेक्षा मध्य रेल्वेने लोकल सेवा सुरळीत चालविणे अपेक्षित आहे. यासह रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद