मुंबई/पुणे - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील वाहतूक सोमवारी (1 जुलै) विस्कळीत झाली आहे. कर्जत-लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे घसरल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती मिळत आहे. याचा रेल्वे सेवेला फटका बसला असून अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान पहाटे 4.30 च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम झाला आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱ्या ट्रेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसेच हुजूर साहिब एक्स्प्रेस पनवेलला न जाता पुण्यात येथे थांबवण्यात आली आहे. हमसफर एक्स्प्रेस देखील पनवेलमध्ये थांबल्याची माहिती मिळत आहे. मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेने लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात 1 जुलैपासून बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार 30 पॅसेंजर आणि 29 मेल, एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आला आहे. पावसाळ्यात दृष्यमानता कमी असल्यामुळे मोटरमनला वेगावर नियंत्रण ठेवावे लागत असले, तरी पावसाळ्यानंतर या गाड्या नियोजित वेगानुसार धावतील, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
सीएसएमटी-गडग एक्स्प्रेस 1 जुलैपासून आठवड्यातील सहा दिवस धावेल. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-कन्याकुमारी एक्स्प्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, हावडा-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस, मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सुपरफास्ट गाडीत रुपांतर
सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे रूपांतर सुपरफास्टमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे सोलापूर-कोल्हापूर प्रवासात 65 मिनिटे, तर कोल्हापूर-सोलापूर प्रवासात 120 मिनिटे वाचणार आहेत. या दोन्ही गाड्यांनी 22133/22134 हे नवीन गाडी क्रमांकाने देण्यात आले आहेत. तसेच हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस 5 ऑक्टोबर आणि एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस 6 ऑक्टोबरपासून रद्द करण्यात येणार आहे.