मुंबई : नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहेत. बुधवारी (2 जानेवारी) ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याणकडे जाणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. अनेकांसाठी नवीन वर्षामधील आजचा ऑफिसचा पहिलाच दिवस असल्याने या गोंधळामुळे त्यांना लेट मार्क लागण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. ठाणे आणि मुलुंड स्टेशनदरम्यान कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. तसेच काही गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
तांत्रिक बिघाड आणि रुळाला तडे गेल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.