मुंबई - राजधानी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना सकाळी-सकाळीच त्रास सहन करावा लागला आहे. ठाकुर्लीत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम जलद धीम्या लोकलच्या वेळापत्रकावर झाला आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल 35 मिनिटे विलंबाने धावत आहेत.
कल्याण-ठाकूर्ली स्थानकादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जवळपास अर्धा तास उशिराने लोकल धावत आहेत. दुसऱ्या आठवड्यातील सोमवारचा म्हणजेच कार्यालयीन आठवड्याचा पहिला दिवस असल्यानं प्रवाशांची गर्दी आहे. मात्र, सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने चाकरमान्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होणार आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने डोंबिवली स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, वेगळ्या लाईनच्या गाड्या पकडून शक्यतो वेळेत कार्यालयात पोहचण्यासाठी प्रवाशांची धडपड होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, सेंट्रल रेल्वेच्या विशेष पथकाने डोंबिवली स्थानकावर भेट दिली असून लवकरच सेवा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले आहे.