दादर स्थानकातील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 02:51 AM2018-09-06T02:51:53+5:302018-09-06T02:52:07+5:30
दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. बुधवारी दुपारी हा बिघाड झाल्यामुळे माटुंगा-शीव मार्गावर लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या.
मुंबई : दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. बुधवारी दुपारी हा बिघाड झाल्यामुळे माटुंगा-शीव मार्गावर लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. लोकलमध्ये योग्य माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जवळचे स्थानक गाठले. लोकलच्या रांगा लागल्यामुळे लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या. परिणामी, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
दादर स्थानकातून दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाणे दिशेला लोकल रवाना झाली. ही लोकल रवाना झाल्यानंतर सव्वा चारच्या सुमारास दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये बिघाड झाल्याने पॉइंट फेल झाला. यामुळे धिम्या मार्गावरील ७ ते ८ लोकल स्थानकादरम्यान खोळंबल्या होत्या. अखेर ४ वाजून ४१ मिनिटांनी बिघाड दुरुस्तीनंतर लोकल फेऱ्या पूर्ववत केल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी दिली. दरम्यान, रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्यास स्थानकात आणि लोकलमध्ये उद्घोषणा यंत्रातून प्रवाशांना योग्य माहिती देण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.