लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेने नोव्हेंबरमध्ये १३ कोटी ८० लाख प्रवाशांनी प्रवास केला असून त्यांत १२ कोटी २० लाख उपनगरी आणि १ कोटी ६० लाख मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५५४ कोटींचा महसूल मिळवला आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पन्न मेल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून मिळाले असून, ते ४७० कोटी आहे.
मध्य रेल्वेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून ४,९६६ कोटी उत्पन्न मिळाले आहे. या कालावधीत १०६ कोटी ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षी याच कालावधीत मिळालेले उत्पन्न ४,६९९ कोटी होते. त्यात ५.६६ टक्क्यांची वाढ झाली. तसेच प्रवासी संख्येमध्ये २.३५ टक्क्यांची वाढ झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर मुंबईमधून दररोज १८१० उपनगरीय गाड्या तसेच २०० पेक्षा अधिक मेल/ एक्स्प्रेस चालविल्या जातात. लोकलने दररोज ३५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असून एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या गेल्या ७ महिन्यांमध्ये ९३ कोटी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. या माध्यमातून ६३८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर मेल एक्स्प्रेसने दररोज ३ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, याच कालावधीत १०६ कोटी ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यांच्या माध्यमातून ४,३२८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.