मुंबई : फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे सुरू असलेला मध्य रेल्वेवरचा जम्बो ब्लॉक रविवारी संपुष्टात आला. त्यानंतर लोकलसेवा अधिक गतिमान होईल, अशी आशा असतानाच सोमवारी मात्र मध्य रेल्वेचे ये रे माझ्या मागल्या सुरूच असल्याचे चित्र होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची लोकलसेवा खोळंबली. ४५ मिनिटे ते एक तास गाड्या उशिराने धावत होत्या. परिणामी नोकरदारांना कार्यालय गाठण्यात उशीर झाला.
सीएसएमटी, ठाणे येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी मध्य रेल्वेने जम्बो ब्लॉक जाहीर केला होता. रविवारी तो संपुष्टात आला. सोमवारी सकाळीच सीएसएमटी येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ६९ फे-या रद्द कराव्या लागल्या. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. कर्जत, कसारा, खोपोलीहून सकाळी सीएसएमटीकडे निघालेल्या प्रवाशांना फलाटांवर तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ लोकलची वाट पाहावी लागत होती. एवढ्या वेळाने लोकल दाखल झाल्यानंतर खच्चून भरलेल्या लोकलमध्ये प्रवाशांना प्रवेश मिळत नव्हता. ठाणे जिल्ह्यातील २१ लाख प्रवाशांना या बिघाडाचा त्रास झाला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळा येथून आलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसला.
पश्चिम रेल्वेवरही गोंधळ मध्य रेल्वेच्या गोंधळात भरीस भर म्हणून पश्चिम रेल्वेवरही हीच परिस्थिती होती. बोरिवली येथील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कांदिवलीपासून, दादर आणि चर्चगेट गाठणाऱ्या प्रवाशांना ३० मिनिटांचा लेटमार्क लागला. बोरिवली व कांदिवली रेल्वे स्थानकांवर तर सकाळी प्रवाशांना पाय ठेवण्यास जागा नसल्याचे चित्र होते. अंधेरी, वांद्रे, सांताक्रूझसह उर्वरित रेल्वे स्थानकांतही विलंबाने दाखल होणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना मनस्ताप होत होता. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांनी मेट्रोला प्राधान्य दिल्याने मेट्रो स्थानकांतही गर्दी झाली होती. एमएमएमओसीएलने या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त चार मेट्रो गाड्या सोडल्या. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गर्दी नियंत्रणात आली.
घरी जाणे केले पसंतदिवा, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या स्थानकांवर दुपारी साडेबारापर्यंत प्रवाशांनी तुडुंब भरलेली होती. अनेकांनी गाड्या लेट असल्याने कामावर जाणे टाळले. त्यांनी घरी जाण्याचाच पर्याय स्वीकारला.उद्घोषणा नाही, इंडिकेटर बंदलोकलचा विलंब सोशिक मुंबईकरांनी सहन केला. मात्र, कोणत्याही प्रकारची उद्घोषणा नाही, फलाटांवरची इंडिकेटर यंत्रणा बंद पडलेली, धीम्या मार्गावर जलद गाड्या सोडणे, फलाटावर आलेली लोकल जलद की धिमी याची माहिती प्रवाशांना न देणे अशा प्रकारच्या मध्य रेल्वेच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. लोकलविलंबाचा हा गोंधळ सकाळी १० पासून सुरू झाला तो रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
तांत्रिक बिघाडामुळे लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या, याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रवाशांना दिली जात होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची नवीन सिस्टम बसविण्यात आलेली आहे. या नवीन सिस्टमची तपासणी बसवण्यापूर्वी केली जाते. यातल्या अनेक गोष्टी अशा असतात; ज्यांची तपासणी प्रत्यक्षात ती मुव्हमेंट केल्याशिवाय करता येत नाही. यामुळे नवीन सिस्टमला स्थिर होण्यास वेळ लागतो. बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञांची टीम सलग काम करत आहे. लवकरच हे सगळे बिघाड दुरुस्त करून लोकलच्या फेऱ्या नियमितपणे चालू होतील.- डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे