Join us

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार गारेगार; पहिली एसी ट्रेन सप्टेंबरमध्ये धावणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 11:50 AM

ही एसी लोकल मध्य रेल्वेवर सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या सुमारास सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर धावणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून मध्य रेल्वेवर पहिली वातानुकुलित रेल्वे धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या विळख्यातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेवर एसी ट्रेन धावू शकेल.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार मध्य रेल्वेवरील एसीचे डबे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मिळू शकतील. ही एसी लोकल मध्य रेल्वेवर सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या सुमारास सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर धावणार आहे. एसी लोकलमधील दरवाजे उघडणे आणि बंद होणे यातील वेळेचे नियोजन आणि काही तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले जातील. जर दार उघडणे आणि बंद होणे यातील वेळेचा कालावधी जास्त असेल तर ही एसी लोकल हार्बर मार्गावर गोरेगाव ते पनवेल, गोरेगाव ते सीएसएमटी वळविण्यात येईल. 

पश्चिम रेल्वेवर एसी लोकलची सुरुवात डिसेंबर 2017 मध्ये झाली होती. मध्य रेल्वेकडून एसी लोकलचे दरवाजे उघडणे-बंद करणे यातील वेळेत घट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे इतर ट्रेन्सच्या वेळेवर कोणतीही अडचण येणार नाही. सामान्य लोकल ट्रेन नियोजित वेळेत चालविण्यात येतील. एकूण 12 एसीचे डबे मुंबईसाठी पाठविण्यात आले आहेत. यातील 2 दोन डबे पश्चिम रेल्वेसाठी देण्यात आले आहेत. तर इतर डबे टप्प्याटप्प्याने मध्य रेल्वेसाठी देण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. 

सर्वप्रथम २५ डिसेंबर, २०१७ पासून पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना एसी लोकलच्या माध्यमातून थंडगार प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून दिली. वर्षभरात एसी लोकलमधून सुमारे ४० लाख प्रवाशांनी प्रवास केला. यात महिन्याला सरासरी ३ ते ४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत १६ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले. एसी लोकल सुरुवातीच्या काळात मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर, वसई रोड या स्थानकांवर थांबायची. यात बोरीवली स्थानकात सर्वाधिक उत्पन्न मिळत आहे. त्यानंतर मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा या सात स्थानकांवर तिला थांबा मिळाल्याने प्रवाशांत वाढ झाली. 

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे