Join us

मोठी दुर्घटना! माटुंगा स्टेशनवर गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या; ३ डबे घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 11:28 PM

मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई:मुंबईतीलमध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकावर एक मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्याने हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामुळे तीन डबे घसरले असून, यात कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे लोकल वाहतूक यामुळे विस्कळीत झाली असून, कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. 

काही लांब पल्ल्याच्या ट्रेनची सेवा दादर येथे समाप्त 

या दुर्घटनेमुळे काही लांब पल्ल्याच्या ट्रेन दादर स्थानकावरच थांबवण्यात आल्या आहेत. नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस, करमळी-दादर तेजस एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेन दादर स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. तसेच या दुर्घटनेमुळे रद्द झालेल्या ट्रेनचे प्रवासी ३ दिवसांत परताव्यासाठी अर्ज करू शकतात, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच रेल्वेकडून काही हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. CSMT - 022-22694040, दादर - 022-24114836, ठाणे - 022-25334840, कल्याण - 0251-2311499.

पाँडिचेरी एक्स्प्रेसचे मागचे ३ डबे रुळावरून घसरले

 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने माटुंगा रेल्वे स्थानकात पुदुच्चेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :मध्य रेल्वेभारतीय रेल्वेमुंबई