मध्य रेल्वेने टाकली मान; ‘जम्बो ब्लॉक’पूर्वीच लोकलचा लेटमार्क, आज १६१ फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:55 AM2024-05-31T05:55:03+5:302024-05-31T05:56:52+5:30
अतिरिक्त बस चालविण्याची विनंती करण्यात आली असून प्रवाशांनी सहकार्य करावे, रेल्वेचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील रेल्वे फलाटांच्या विस्तारीकरणासाठी तीन दिवस घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकपूर्वीच लोकलला गुरुवारी तब्बल १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क लागला. परिणामी प्रवाशांना फलाटांवर लोकलची प्रतीक्षा करावी लागली. या परिस्थितीमुळे सीएसएमटी, भायखळा, कुर्ला आणि घाटकोपर या स्थानकांवर प्रवाशांचा संताप अनावर झाला.
मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गुरुवारी सकाळपासूनच लेटमार्कचा फटका बसू लागला. बहुसंख्य लोकल १५ ते ३० उशिराने धावत होत्या. दुपारी स्थानकांवर आणि लोकलमध्ये ‘पीक अवर’च्या तुलनेत गर्दी कमी असली तरी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. लोकल दादरपर्यंत सीएसएमटी येथील ब्लॉकमुळे काही लोकल भायखळा तर काही लोकल दादरपर्यंत चालविण्यात येणार आहेत.
- प्रवासी ताटकळत- विद्याविहार, माटुंगा, चिंचपोकळी, करी रोड, कांजूरमार्गसारख्या लहान रेल्वे स्थानकांवर प्रवासी खूप वेळ लोकलची वाट पाहत ताटकळत असल्याचे चित्र होते.
- ठाण्यात काय स्थिती?- ठाणे येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्री १२:३० वाजल्यापासून सुरू झालेला ६३ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२:३० पर्यंत असणार आहे.
- सीएसएमटी येथे काय स्थिती?- सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी शुक्रवारी रात्री १२:३० वाजता सुरू होणारा ३६ तासांचा ब्लॉक रविवारी दुपारी १२:३० पर्यंत असणार आहे.
- ठाणे ते सीएसएमटी दरम्यान किती फेऱ्या रद्द?- ठाणे येथील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील १६१ लोकल फेऱ्या शुक्रवारी रद्द करण्यात आल्या असल्या तरी ठाणे ते सीएसएमटी किती लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे, याची माहिती देण्यास रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.
प्रवाशांनी सहकार्य करावे!
सीएसएमटी आणि ठाणे येथे फलाटांच्या विस्तारासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवारी कामाचा दिवस आहे. तिन्ही दिवस मिळून ९३० लोकल फे-या रद्द करण्यात अलया आहेत. प्रवाशांना विनंती आहे की महत्त्वाचे काम नसेल तर लोकलने प्रवास करू नका. कार्यालयांनीही कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. अतिरिक्त बस चालविण्याची विनंती करण्यात आली आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे.
- राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे