खूशखबर! मध्य रेल्वेला मिळणार 6 नव्याकोऱ्या एसी लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 09:26 PM2019-01-03T21:26:36+5:302019-01-03T21:30:02+5:30
आता मध्य रेल्वेच्या प्रवाशांना सेकंडहॅण्ड नव्हे, तर फर्स्टहॅण्ड गाड्या
मुंबई: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. या वर्षात मध्य रेल्वेवर 6 एसी लोकल धावणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व लोकल नव्या असणार आहेत. याआधी अनेकदा पश्चिम रेल्वेवर धावलेल्या लोकल मध्य रेल्वेकडे वळवल्या जायच्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. ही नाराजी लक्षात घेऊन आता रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेला नव्या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत 12 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. यातील 6 गाड्या मध्य आणि 6 गाड्या पश्चिम रेल्वेवर धावतील. याआधी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अनेक नव्या लोकल सर्वप्रथम पश्चिम रेल्वेवर धावल्या. त्यानंतर त्या मध्य रेल्वेला देण्यात आल्या. त्यामुळे मध्य रेल्वेला कायम सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत होती. हीच बाब लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेला नव्या कोऱ्या एसी लोकल देण्यात येणार आहेत.
नवीन वर्ष मध्य रेल्वेसाठी विशेष ठरणार आहे. नव्या एसी लोकलसोबतच मध्य रेल्वेवरुन राजधानी एक्स्प्रेसदेखील धावणार आहे. गेली अनेक दशकं पश्चिम रेल्वेवरून दोन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीला जातात. मात्र आता मध्य रेल्वेवरुन राजधानी एक्स्प्रेस सुटणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ही घोषणा केली. राजधानी एक्स्प्रेस सीएसएमटीवरून सुटणार आहे. नंतर ती कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झांसी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन मार्गे जाईल. यामुळे पहिल्यांदाच राजधानी एक्स्प्रेस गुजरातऐवजी मध्यप्रदेशातून धावेल.