मध्य रेल्वेने केले ३२३ पार्सल गाड्याचे नियोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 06:58 PM2020-05-05T18:58:01+5:302020-05-05T18:58:46+5:30
पार्सल गाडीमधून ३ हजार ४०० टन सामग्रीची वाहतूक
मुंबई : लॉकडाऊन काळात मध्य रेल्वे प्रशासनाने पार्सल गाड्या चालविण्याचे नियोजन केले आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये एकूण ३२३ पार्सल गाडया चालविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी रेल्वेने वेळापत्रक तयार केले आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत २३० वेळापत्रकानुसार पार्सल गाड्या धावल्या असून यातून ३ हजार ४०० टन सामग्रीची वाहतूक केली आहे. जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी मध्य रेल्वेची मालगाडी, पार्सल सेवा सुरू आहे. फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशवंत वस्तूंसाठी रेल्वेने पार्सल स्पेशल ट्रेनचे मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार अन्नधान्य,पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत.
मध्य रेल्वेच्या भुसावळ, मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर विभागातून मध्य रेल्वेने ३२३ पार्सल गाड्यांचे वेळापत्रक तयार केले आहे. त्यापैकी २३० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या आहेत. आणखीन ९३ गाड्या धावल्या जाणार आहेत. २३० पार्सल गाडयांमधून मध्य रेल्वेने ३ हजार ४०० टनांहून अधिक पार्सलची वाहतूक लॉकडाऊन दरम्यान केली. यामध्ये ४९८ टन औषध व वैद्यकीय उपकरणे आणि १ हजार ३९७ टन नाशवंत वस्तू, ३४ टन टपाल बॅग, २९ टन ई-कॉमर्स वस्तूंचा समावेश होता. कोरोनाशी सामना करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मेपर्यंत म्हणजे आणखीन दोन आठवडे लॉकडाऊन वाढला आहे. प्रवासी रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र देशाच्या विविध भागात आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मालगाडी आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम सुरु आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत आहे.