मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उभारले हर्बल गार्डन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:06 AM2021-03-17T04:06:08+5:302021-03-17T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेकडून आपल्या प्रवाशांसाठी पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८च्या प्रवेशद्वाराजवळ हेरिटेज गल्ली येथे हर्बल गार्डन करण्यात आले आहे.
हर्बल गार्डनमध्ये हर्बल वनस्पती आणि झुडुपांच्या सुमारे १२९ विविध प्रजातींचा संग्रह आहे. हर्बल वनस्पतींमध्ये अश्वगंध हा कुष्ठरोग, चिंताग्रस्त विकार, रक्तवाहिन्यासंबंधी रोग, संधिवात आणि सर्व प्रकारच्या अशक्तपणासाठी शक्तिवर्धक म्हणून आणि जोम व चैतन्य निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो; ब्राह्मी जी अपस्मार, वेडेपणा आणि स्मरणशक्ती नष्ट होणे यासारख्या मानसिक विकारांच्या उपचारांमध्ये वापरली जाते; इवनिंग प्रायम रोझ, ही वनस्पती त्यातील तेल कॉस्मेटिक हेतूंसाठी आणि मासिक पाळीच्या संबंधित उपचारांसाठी आहारपूरक म्हणून व्यापकपणे वापरले जाते; मेन्थॉल पुदीना, हे टूथपेस्ट, माऊथ वॉश आणि कॉस्मेटिक्स तयार करण्यामध्येदेखील वापरली जाते. मेन्थॉलचा उपयोग पेनबाम, एनाल्जेसिक क्रिम आणि खोकल्याचे औषध इत्यादी औषधांमध्येदेखील केला जातो.
या संग्रहात अडुळसा, अजवाईन, अपमार्ग, इलायची, मिरे, शतावरी, तुळसी इत्यादी औषधींचा समावेश आहे जो खोकला आणि सर्दीवर प्रभावी उपाय म्हणून वापरला जातो, अंजीर, हळद, इन्सुलिन, गुडमार, तेज पत्ता इत्यादी मधुमेहासाठी आणि इतर औषधी ब्रिंगराज, सर्प गंधा, गिलोई, लवंग इ. औषधी वनस्पती अनेक रोग आणि आजारांवर प्रभावी उपाय आहेत.
औषधी वनस्पती सामान्यत: रक्तदाब कमी होणे, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखणे किंवा कर्करोगाचा धोका कमी करणे अशा अनेक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. जैवविविधता सुधारण्याव्यतिरिक्त, ही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात आणि वायू आणि ध्वनिप्रदूषण कमी करण्यासदेखील मदत करतात.
मध्य रेल्वे निसर्गाचे रक्षण आणि संगोपन करण्यात नेहमीच अग्रणी असते आणि त्याचा बागकाम विभाग विविध वनस्पती आणि फुलांच्या प्रदर्शनात अनेक पुरस्कार आणि करंडकांचा विजेता ठरला आहे. हा उपक्रम हरित आणि निरोगी रेल्वेकडे जाणारा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.