मुंबई : ज्या दर्जाचे प्रवासी तिकीट घेतात, त्या दर्जाची सेवा द्या, असे म्हणत दक्षिण मुंबई जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने मध्य रेल्वेला प्रवाशाला अस्वच्छतेमध्ये प्रवास करण्यास भाग पाडल्याबद्दल १९ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी दिला.लोकमान्य टिळक टर्मिनसहून एर्नाकुलमला जाण्यासाठी दुरान्तोचे प्रीमियम तिकीट घेणाऱ्या दोन महिला प्रवाशांना १९ हजारांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने मध्य रेल्वे व केंद्र सरकारला दिला.या दोन्ही प्रवाशांनी ७ नोव्हेंबर २०१५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुरान्तो एक्स्प्रेस पकडली. या एक्स्प्रेसमध्ये उंदीर असल्याची तक्रार त्यांनी तेथील रेल्वेच्या कर्मचाºयांकडे केली. मात्र, त्यांनी तक्रारीची दखल घ्यायची सोडून ही नित्याचीच बाब असल्याचे तक्रारदारांना सांगितले. एवढी मोठी ट्रेन साफ करायला केवळ तीन तास मिळतात. या कालावधीत संपूर्ण ट्रेन साफ करणे शक्य नाही. एक्स्प्रेसमध्ये उंदीर असणे, ही नित्याची बाब आहे, असे संबंधित कर्मचाºयाने तक्रारदारांना सांगितले. या उत्तरामुळे तक्रारदारांनी तिकीट तपासनीसाकडे तक्रार केली. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०१५ ला एर्नाकुलमवरून मुंबईला येतानाही त्यांनी तिकीट तपासनीसाकडे याबाबत तक्रार केली.कित्येक दिवस उलटूनही तक्रारीवर रेल्वेकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने या दोघींनीही ग्राहक मंचात धाव घेतली. सुनावणीत मध्य रेल्वेने ही बाब आपल्या अखत्यारीत येत नसल्याचे म्हणत हात वर केले. केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना प्रतिवादी करावे, असा युक्तिवाद केला. त्यानुसार केंद्र सरकारला प्रतिवादी केल्यानंतर केंद्राने कानावर हात ठेवले. दरवेळी ट्रेन स्वच्छ करण्यात येते. प्रवाशांना स्वच्छ पाणी व जेवण पुरविण्यात येते. शौचालयेही स्वच्छ असतात. ट्रेनमध्ये उंदीरही नसतात. याबाबत केवळ या दोघींनीच तक्रार केली आहे, इतरांची तक्रार केली नाही. साक्षीदार कोणी नाही, असा लेखी युक्तिवाद केंद्र सरकारतर्फे करण्यात आला. परंतु, ग्राहक मंचाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला.
मध्य रेल्वेला सेवेतील कमतरता भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 4:55 AM