Join us

रूळ तुटल्याने मध्य रेल्वे ठप्प, ऐन गर्दीच्या वेळी नोकरदारांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 5:16 AM

अंबरनाथ : कर्जतहून सकाळी साडेसहाच्या दरम्यान सीएसएमटीकडे येणारी लोकल बदलापूर-अंबरनाथदरम्यान आली असता रेल्वेमार्ग तुटल्याचे निदर्शनास आले.

अंबरनाथ : कर्जतहून सकाळी साडेसहाच्या दरम्यान सीएसएमटीकडे येणारी लोकल बदलापूर-अंबरनाथदरम्यान आली असता रेल्वेमार्ग तुटल्याचे निदर्शनास आले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली. यामुळे बदलापूर, वांगणी, शेलू आणि अंबरनाथ स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. बदलापूरहून लोकल पुढे जात नसल्याने बदलापूरच्या प्रवाशांनी कामावर जाण्यासाठी अंबरनाथ आणि कल्याण स्थानक गाठले. बदलापूरहून अनेक प्रवासी मिळेल त्या वाहनाने अंबरनाथ स्थानकात आल्याने तेथे फलाट प्रवाशांनी गच्च भरला होता.गर्दीच्या वेळी रेल्वे रूळ तुटल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक ठप्प झाली. रेल्वे रूळ तुटल्याचे प्रवाशांच्याही लक्षात आल्याने अनेक प्रवाशांनी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. अंबरनाथहून सुटणारी लोकल तेथेच गच्च भरली होती. त्यामुळे उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी स्थानकांत लोकलमध्ये चढणाºयांचे हाल झाले. रेल्वे रूळ दुरुस्त करण्यासाठी वेळ लागणार असल्याने अनेक कामगारांनी घरी जाणेच पसंत केले. अंबरनाथ स्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख व्यवस्था केली होती. फलाट क्रमांक-२ वर प्रवाशांची गर्दी पाहता त्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत होती. रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याचे कळताच रिक्षाचालकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. ५० ते १०० रुपये शेअर सीट घेऊन प्रवाशांना अंबरनाथ स्थानकात सोडले जात होते. त्यामुळे काही प्रवाशांनी खासगी वाहनांतून लिफ्ट घेत अंबरनाथ स्थानक गाठले. रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यावरही स्थानकात तासभर प्रवाशांची गर्दी कायम होती.>मोठी घटना टळलीथंडीच्या दिवसांत रेल्वेमार्गाला तडा जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, शुक्रवारची घटना फार भयंकर होती. रुळाचा तुकडाच पडला होता. जर यावरून लोकलचे चाक गेले असते, तर स्लीपर तुटून मोठी दुर्घटना घडली असती.