Join us

मध्य रेल्वेला लागली ‘लॉटरी’

By admin | Published: February 28, 2015 1:54 AM

काल मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला चांगलीच लॉटरी लागली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मध्य

मुंबई : काल मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वेला चांगलीच लॉटरी लागली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रेल्वे अर्थसंकल्पात मध्य रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात नवीन प्रकल्प आणि कामांना मंजुरी देण्यात आली असून त्याची एकूण किंमत ११ हजार कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये नवीन मार्ग, दुहेरीकरण, नव्या मार्गांचे सर्वेक्षण, प्रवाशांसाठी सोयी इत्यादींचा समावेश असून मुंबई, नवी मुंबई, पुणे, मिरज, नागपूर, वर्धा, पंढरपूर, अहमदनगर, बारामती, औरंगाबाद, लातूर, सोलापूर शहरांना चांगलेच स्थान देण्यात आले असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वे मार्गावरील ११२ किलोमीटरच्या कराड-चिपळूण नवीन मार्गाला मंजुरी देण्यात आली असून त्याची किंमत बाराशे कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे कोकण कराडला जोडले जाईल. त्याचबरोबर पाच दुहेरी आणि तिहेरी मार्गांना मंजुरी मिळाली असून त्याची एकूण किंमत ही ९ हजार ३९३ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये पुणे-लोणावळा या ६४ किलोमीटरच्या तिसऱ्या मार्गालाही मंजुरी मिळाली असून त्याची किंमत ८00 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पुणे-मिरज ४ हजार ६७0 कोटी, वर्धा ते बल्लारशहा ६३0 कोटी (तिसरा मार्ग), कैजीपेठ ते बल्लारशहा २ हजार २0 कोटी, नागपूर ते राजनंदगाव १ हजार २७३ कोटी रुपये यांचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मध्य रेल्वेवरील सुरक्षासंबंधी कामांसाठी एकूण २ हजार ९९३ कोटी ५८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमध्ये रोड ओव्हर ब्रिज, रोड अंडर ब्रिज आणि लेव्हल क्रॉसिंग गेटचा समावेश असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)