मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
By अनिकेत घमंडी | Published: May 13, 2024 10:20 AM2024-05-13T10:20:45+5:302024-05-13T10:21:07+5:30
ठाण्यात सिग्नल यंत्रणा आणि पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड, सहा मार्ग बंद
मध्य रेल्वेवर आठवड्याच्या कामावर जाण्याच्या पहिल्याच दिवशी लोकल सेवा ठप्प झाली आहे. गेल्या तासाभरापासून लोकल ठाणे स्थानकापूर्वी ठाणे खाडीवर गेल्या तासाभरापासून थांबलेली आहे. यामुळे प्रवाशांना चालत ठाणे स्टेशन गाठावे लागले आहे. तासाभरानंतर लोकलसेवा पुन्हा सुरु झाली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वेची सिग्नल, पॅनल यंत्रणा ठप्प झाल्याने सहा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९:२५ वाजता घडली.
त्यामुळे आठवडयाच्या पहिल्याच दिवशी हजारो चाकरमान्यांना लेट मार्कला सामोरे जावे लागले. दिवा ते मुलुंड मार्गावर लोकल, लांबपल्याच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या, प्रवासी लोकल मध्ये स्थानकात ठिकठिकाणी ताटकळले होते.
नेमका बिघाड कुठे कशामुळे झाला याची पाहणी रेल्वे कर्मचारी करत असून कामाला सुरुवातझाली असल्याचे सांगण्यात आले. मात्र आधीच उन्हाळा वाढला असल्याने उकड्यात वाढ झाली असताना लोकल गर्दीने खचाखच भरलेल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे, दिवा, मुंब्रा स्थानकात गर्दी असल्याचे सांगण्यात आले. जे प्रवासी ठाणे स्थानकाजवळ आले होते, त्यांनी अखेर रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून स्थानक गाठणे पसंत केले, मात्र महिला, ज्येष्ठ नागरिकांची मात्र यामध्ये पंचाईत झाली. त्यांना लोकलमध्येच बसावे लागले.