लोकल थांबवून मोटरमनची रुळांवरच लघुशंका; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:17 PM2019-07-18T12:17:48+5:302019-07-18T12:20:40+5:30
सोशल मीडियावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया
मुंबई : सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलमधून उतरुन मोटरमनने लोकलसमोरच लघुशंका उरकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांदरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी काहींनी मोटरमनवर कारवाईची मागणी केली. तर लघुशंका ही नैसर्गिक नसल्यानं कारवाईची तरतूद नसल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं.
उल्हासनगर रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी लोकल काल दुपारी अडीचच्या सुमारास रवाना झाली. मात्र श्रीराम चौक उड्डाणपुलाजवळ अचानक लोकल थांबली. सिग्नल नसतानाही लोकल थांबवण्यात आल्यानं दरवाज्यात उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना आश्चर्य वाटलं. लोकल थांबवल्यानंतर मोटरमन खाली उतरला. लोकलच्या अगदी समोरच त्यानं लघुशंका केली. यानंतर मोटरमन लोकलमध्ये चढला आणि त्यानं लोकल सुरू केली.
It happens only in India, local train driver stop the train for loo on the track near ulhasnagar. pic.twitter.com/Vjb5FYKbMq
— Anees S Bobre (@bobre_s) July 17, 2019
हा संपूर्ण प्रकार एका स्थानिक पत्रकारानं कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावर संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. काहींनी याबद्दल संताप व्यक्त केला. तर अनेकांनी इतक्या लांब पल्ल्याच्या गाड्या चालवत असलेल्या मोटरमननं अशा वेळी करावं तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला. कर्जत, कसारा, खोपोलीपर्यंत गाड्या नेणाऱ्या मोटरमनची अवस्था प्रवाशांना समजून घ्यावी. प्रवाशांना जो त्रास होतो, तोच मोटरमनलादेखील होतो, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रियांची संख्या जास्त आहे.