मुंबई: मुंबईतील मध्य रेल्वेच्या मोटरमननी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मोटरमन युनियन, डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये दोन तास झालेल्या बैठकीनंतर हा संप मिटला. मोटरमनच्या रिक्त जागा त्वरित भरा, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करा या मोटारमनच्या प्रमुख मागण्या होत्या. त्यासाठी मोटारमननी ओव्हर टाईम न करता केवळ नियमित वेळत काम करण्याचं मध्य रेल्वे मजदूर संघानं जाहीर केलं होतं. मोटारमनच्या रिक्त जागा भरण्याची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं. त्यानुसार ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 मोटारमनची भरती करण्यात येणार आहे. यासोबतच सिग्नल ओलांडल्यानंतर होणारी शिक्षादेखील शिथिल केली जाणार आहे. त्यामुळे मोटारमन पूर्वीप्रमाणे ओव्हरटाईम करण्यास तयार झाले आहेत. सध्या मध्य रेल्वेतील मोटारमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदं रिक्त आहेत. त्यामुळे मोटारमनला ओव्हरटाईम करावा लागतो. मोटारमननी ओव्हरटाईम न केल्यास मध्य रेल्वेला 150 पेक्षा अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात.
मध्य रेल्वेवरील मोटारमनचं आंदोलन मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 9:28 PM