मुंबई : मध्य रेल्वेवरील पहिली राजधानी एक्स्प्रेस (मुंबई-दिल्ली) शनिवार, १९ जानेवारीपासून धावली. ही ट्रेन पुन्हा मुंबईला नियोजित वेळेच्या तब्बल 13 मिनिटे आधी पोहोचल्याने एरवी कधीही वक्तशीर नसलेल्या मध्य रेल्वेने एकप्रकारे विक्रमच केला आहे.
ही एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून नाशिकमार्गे हजरत निझामुद्दिन (दिल्ली) ला जाते. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी जंक्शन, आग्रा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
सोमवारी ही राजधानी एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 11 वाजून 42 मिनिटांना पोहोचली. हा वेळ नियोजित वेळेपेक्षा 13 मिनिटे अगोदरचा आहे.
आठवड्यातून दोन दिवस धावणारदिल्ली आणि मुंबई या दोन राजधान्यांचा दुवा नाशिक असणार आहे. राजधानी एक्स्प्रेस नाशिकमार्गे मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली होती. या गाडीमुळे मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. बुधवारी आणि शनिवारी गाडी क्र. २२२२१ सीएसएमटी ते निझामुद्दिन राजधानी एक्स्प्रेस सकाळी २.२० वाजता सुटेल. गुरुवारी आणि रविवारी गाडी क्र. २२२२२ निझामुद्दिन ते सीएसएमटी राजधानी एक्स्प्रेस दुपारी ३.४५ वाजता सुटणार आहे.