कोरोनाला टक्कर देणार मध्य रेल्वेचा रोबोट; माेबाइल ॲपचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 07:14 AM2020-12-20T07:14:44+5:302020-12-20T07:15:13+5:30
Central Railway : प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेने फेब्रीआय आणि द रोबोटिक कॅप्टन अर्जुन उपयोगात आणले.
मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी मध्य रेल्वेच्या टीमने अथक प्रयत्नांनंतर इनहाउस डिझाइन तसेच रोबोट आणि रोबोटिक उपकरणे तयार करून प्रवाशांच्या स्क्रीनिंगसाठी वापरले. यामुळे सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने प्रवाशांना हाताळणे सोपे झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेने फेब्रीआय आणि द रोबोटिक कॅप्टन अर्जुन उपयोगात आणले. ही दोन्ही रोबोटिक उपकरणे थर्मल आधारित स्क्रीनिंग सिस्टम आहेत जी शरीराचे तापमान पाहण्यासाठी आणि नोंद करण्यासाठी वापरतात. फेब्रीआय हा एक स्थापित केलेला कॅमेरा आहे जो तेथून जाणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग करतो, तर कॅप्टन अर्जुन हे एक फिरणारे उपकरण आहे ज्यात प्रवाशांचे स्कॅनिंग हाेते.
प्रवासी, सामानाशी शून्य संपर्क
सामान आणि इतर संपर्कांच्या माध्यमातून संक्रमण रोखण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि नागपूर यासारख्या प्रमुख स्थानकांवर स्वयंचलित बॅगेज रॅपिंग आणि सॅनिटायझेशन सुविधा सुरू केली.
माेबाइल ॲपचा वापर
सुरक्षित तिकिटासाठी मध्य रेल्वेने एटीएमएचा वापर केला. आरक्षण केंद्रातील (पीआरएस) आरक्षित तिकिटे सुरक्षित पद्धतीने तपासण्यासाठी चेक-इन मास्टर नावाच्या मोबाइल अॅपने ओसीआर आणि क्यूआर कोडसह स्कॅनिंग सुविधादेखील सुरू केली.