बाप्पासाठी 'लाइफलाइन' रात्रभर! गणपती दर्शनासाठी मध्य रेल्वेचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 16:48 IST2024-09-13T16:47:06+5:302024-09-13T16:48:17+5:30
मध्य रेल्वेने १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पहाटेपर्यंत विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

बाप्पासाठी 'लाइफलाइन' रात्रभर! गणपती दर्शनासाठी मध्य रेल्वेचा मुंबईकरांसाठी मोठा निर्णय
Mumbai Local : मुंबईत गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. लाखो भाविक गणेश विसर्जनासाठी विविध विसर्जनस्थळी पोहोचतात. यानिमित्ताने गिरगाव, दादर, जुहू यांसारख्या चौपाट्यांवर मोठी गर्दी उसळले. या दिवशी बहुतांश सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते. भाविकांची सोय लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मुंबईतल्या अनेक ठिकाणी आकर्षक अशा गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या विविध भागात गर्दी करत आहेत. मुंबईत गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध ठिकाणचे लोक चौपाटीवर येऊन मूर्तींचे विसर्जन पाहतात. याच पार्श्वभूमीवर आता मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी रात्रभर लोकल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील नागरिकांना रात्री उशिरापर्यंत गणरायाचे दर्शन करता यावे यासाठी मध्य रेल्वेने १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत पहाटेपर्यंत विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांना याचा फायदा घेता येणार आहे. मध्य रेल्वे १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर गणपती विशेष उपनगरीय लोकल चालवण्यात येणार आहे. या अंतर्गत नऊ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
पाहा वेळापत्रक
सीएसएमटीवरुन रात्री १.४० मिनिटांनी सुटलेली लोकल कल्याण येथे ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल.
सीएसएमटीवरुन रात्री २.३० मिनिटांनी सुटलेली लोकल ठाणे येथे ३.३० मिनिटांनी पोहोचेल.
सीएसएमटीवरुन रात्री ३.२५ मिनिटांनी सुटलेली लोकल कल्याण येथे पहाटे ४.४५ वाजता पोहोचेल.
कल्याण येथून रात्री १२.०५ मिनिटांनी सुटलेली लोकल सीएसएमटी येथे रात्री १.३० मिनिटांनी पोहोचेल.
ठाणे येथून रात्री १ वाजता सुटलेली लोकल सीएसएमटी येथे रात्री २ वाजता पोहोचेल.
ठाणे येथून रात्री दोन वाजता सुटलेली लोकल सीएमएमटी येथे रात्री तीन वाजता पोहोचेल.
हार्बर मार्गावर सीएसएमटी येथून रात्री १.३० वाजता सुटलेली लोकल पनवेल येथे २.५० मिनिटांनी पोहोचेल.
सीएसएमटी येथून रात्री २.४५ मिनिटांनी सुटणारी लोकल पनवेल येथे पहाटे ४.५ मिनिटांनी पोहोचेल.
पनवेल येथून रात्री १ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटी येथे २.२० मिनिटांनी पोहोचेल.
पनवेल येथून रात्री १.४५ मिनिटांनी सुटणारी लोकल सीएसएमटी येथे ३. ५ मिनिटांनी पोहोचेल.