गदग-पुदुच्चेरी एक्स्प्रेस धडकेचे कारण आले समोर! सिग्नल तोडल्याने माटुंगा दुर्घटना; रेल्वेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:02 PM2022-04-16T20:02:06+5:302022-04-16T20:03:34+5:30
सिग्नल नसतानाही गदग एक्स्प्रेसच्या लोको पायलटने रेल्वे पुढे नेली, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई:मध्य रेल्वेवरील दादर आणि माटुंगा या स्थानकादरम्यान गदग आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक अनेक तास ठप्प होती. नोकरीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र, या दुर्घटनेचे कारण आता समोर आले आहे. मध्य रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली असून, सिग्नल तोडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले जात आहे.
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवार रात्री दादरहून निघालेल्या पुदुच्चेरी एक्सप्रेसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्सप्रेसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये पुदुच्चेरी एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरुन घसरले. यामुळे जलद मार्गावरील रेल्वेमार्गाचे नुकसान झाले. गदग एक्सप्रेसच्या लोको पायलट आणि त्याचा सहकाऱ्याने सिग्नल लाल असतानाही तो ओलांडला, नीट पाहिला नाही. त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
आणि पुदुच्चेरी एक्स्प्रेसला गदग एक्स्प्रेस धडकली
दादर स्थानकातून बाहेर पडताच पुदुच्चेरी एक्स्प्रेसला सीएसएमटीहून आलेली गदग एक्स्प्रेस धडकली. त्यामुळे पुदुच्चेरी एक्स्प्रेसचे मागील एस १, एस २ आणि एस ३ हे तीन डबे रुळावरुन घसरले. या धडकेचा आवाज इतका मोठा होता की, दोन्ही एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी रेल्वेबाहेर उड्या मारल्या. अपघातात एस-३ डब्याचे मोठे नुकसान झाले. हा डबा एका बाजूला खांबावर कलंडला होता. या घटनेनंतर दोन्ही रेल्वेमधील प्रवाशांत गोंधळाचे वातावरण होते. या अपघातानंतर मध्य रेल्वेच्या अप व डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकल प्रवाशांचेही हाल झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने माटुंगा रेल्वे स्थानकात पुदुच्चेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाली. रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली.