मध्य रेल्वेने वाचविले आठ कर्करोगाच्या रुग्णांचे प्राण, औषधे त्वरित पोहोचवून बनली तारणहार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 03:06 AM2020-07-08T03:06:27+5:302020-07-08T03:07:00+5:30
बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे २४ तासांच्या आत रक्त कर्करोगाचे औषध पाठवून देण्यासाठी मुंबईच्या पार्सल शाखेने मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट ट्रेन नसल्याने रेल्वे वाहतुकीच्या विविध टप्प्यांनी औषधे पोहोचविण्याची योजना बनवली.
मुंबई : कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेने जलद गतीने कर्करोग रुग्णांसाठी औषधे पोहोचवून देशभरातील ८ हून अधिक कर्करोगाच्या रुग्णांचे प्राण वाचविले आहेत.
बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने मुंबईहून औषधांची आवश्यकता होती. मुंबई ते सोलापूर येथे २४ तासांच्या आत रक्त कर्करोगाचे औषध पाठवून देण्यासाठी मुंबईच्या पार्सल शाखेने मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट ट्रेन नसल्याने रेल्वे वाहतुकीच्या विविध टप्प्यांनी औषधे पोहोचविण्याची योजना बनवली. पार्सल बुकिंगनंतर दोन रुग्णांकरिता कर्करोगाची औषधे सीएसएमटी ते पुणे येथे विशेष पार्सल ट्रेनने तर पुण्याहून साताऱ्याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून नेण्यात आली होती.
तिसºया टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजला नेले. चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव गुड्स ट्रेनमधील गार्ड्सच्या डब्यातून पोहोचविण्यात आले.
या औषधाच्या वाहतुकीचे संपूर्ण समन्वय मुंबई विभाग पार्सल निरीक्षक यांनी केले. शेवटी दोन रुग्णांसाठीचे औषध पाकिटे तीन ट्रान्सशिपमेंटच्या टप्प्यांनंतर बेळगाव येथे मध्यरात्री १.०० वाजता स्थानकातील स्टेशन मॅनेजर यांच्याकडे देण्यात आले.
प्रकाश माने (६९) यांना रक्ताचा कर्करोग आहे. त्यांचा मुलगा श्रीधर माने यांनी स्टेशन मॅनेजरकडून औषधे घेतली. माने म्हणाले, माझ्या वडिलांना रक्ताच्या कर्करोगाच्या औषधाची तीव्र गरज असताना, या कठीण काळात भारतीय रेल्वेने जी सेवा दिली आहे, त्याबद्दल आभार शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
संजय पात्रो यांनी टिष्ट्वट केले की, त्यांचे सासरे आजारी आहेत आणि ओडिशाच्या कोरापटमधील जयपोर येथे आपत्कालीन औषधे तातडीने आवश्यक आहेत. त्यानंतर, औषधे कोणार्क एक्स्प्रेसने ब्रह्मपूर येथे पाठवून देण्यात आली. पुढे मुंबई विभागातील पार्सलचे मुख्य वाणिज्य निरीक्षक यांनी पूर्वतटीय रेल्वेचे, खुर्दा रोड येथील मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रदीप सेनापती यांच्याशी संपर्क साधला. जयपूर येथे औषधे पाठविण्याची सोय करण्याची विनंती केली. हे औषध मिळाल्याने पात्रो यांनी रेल्वेचे आभार मानले.