मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 07:07 AM2024-05-31T07:07:15+5:302024-05-31T07:08:10+5:30

३३ लाखांहून अधिक प्रवाशांना फटका; बेस्टकडून धावणार अतिरिक्त गाड्या

Central Railway sees end of tolerance as Three-day 'jumbo block' angers travel associations | मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप

मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुळातच एवढा मोठा ब्लॉक घेताना रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनांसोबत चर्चा करायला हवी होती. पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करायला हवी होती. मात्र त्यापैकी काहीच करण्यात आलेले नाही. दिवसाला १० लोकल फेऱ्या रद्द झाल्या तरी प्रवाशांचे हाल होतात. तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये, तर ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३३ लाखांहून अधिक प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांनी दिल्या आहेत.

गर्दीचे नियोजन कसे करणार?

मेगाब्लॉक काळात शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यांतील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावे, अशी मागणी शिंदे गटाच्या प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने परिस्थितीबाबत माहिती अगोदर देणे गरजेचे होते. परंतु, विभागाच्या गोंधळामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता गर्दीचे नियोजन रेल्वे प्रशासन कसे करणार, प्रवासादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न सुशीबेन शाह यांनी उपस्थित केले आहेत.

मनमानी कारभाराविरोधात आंदोलन

मध्य रेल्वेच्या  कारभाराविरोधात आणि ब्लॉक मागे घ्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले. मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना एक आठवडा पूर्वसूचना देणे अपेक्षित होते. मात्र, ब्लॉक सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर ब्लॉकची घोषणा केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मेल गाड्यांचे पूर्व बुकिंग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

शनिवार कसोटीचा

शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवार हा कसोटीचा आहे. शनिवारी पूर्ण दिवस-रात्र आणि रविवारी दुपारी १२:३० वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकात लोकल येणार नाही. लोकल मुख्य मार्गावर भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळा स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.  

रेल्वेगाड्या रद्द

ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालविण्यात येतील. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील.

बेस्टकडून धावणार अतिरिक्त गाड्या

सीएसएमटी, ठाणे रेल्वे स्थानकांतील फलाटांची लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने ३ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. याचा लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
३१ मे रोजी रात्री १२:३० पासून २ जून दुपारी १२:३० पर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये बेस्टकडून ५५ अतिरिक्त बसगाड्यांच्या ४८६ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बेस्टतर्फे बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची गर्दीच्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे.

बसमार्ग क्रमांक    पासून    पर्यंत    अतिरिक्त बस

  • १    सीएसएमटी    दादर पूर्व    ४ 
  • २ लिमिटेड    कुलाबा आगार    भायखळा स्थानक    ४ 
  • एसी १०    कुलाबा आगार    वडाळा स्थानक    ४ 
  • एसी १०    कुलाबा आगार    वडाळा स्थानक    ५ 
  • ११ लिमिटेड    सीएसएमटी    धारावी    ५ 
  • १४    डॉ. मुखर्जी चौक    प्रतीक्षानगर    ५ 
  • ए ४५    बॅकबे आगार    एमएमआरडीए वसाहत    ५ 
  • १    कुलाबा आगार    खोदादाद सर्कल    ५ 
  • २ लिमिटेड    सीएसएमटी    भायखळा    ३ 
  • सी ४२    राणी लक्ष्मी चौक    दादलानी पार्क    ५
  • २ लिमिटेड    सीएसएमटी    भायखळा    ५ दुमजली 
  • ए १७४    अँटॉपहील    वीर कोतवाल उद्यान    ५


प्रवाशांच्या मदतीला एसटीची बस सेवा, ठाण्यासाठी जादा ५० बस उपलब्ध

ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असून, या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी मदतीला धावली आहे. एसटी महामंडळाने ब्लॉक काळात जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटीच्या निर्णयानुसार, कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी बस चालविल्या जाणार आहेत. सध्या मुंबई आगारातील २६ आणि ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेता यात आवश्यक्तेनुसार वाढ केली जाईल. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठाणे आणि मुंबई आगारात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

विरार-वैतरणादरम्यान गर्डर बदलण्यासाठी ‘ब्लॉक’

पश्चिम रेल्वेकडून विरार-वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक ९० वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी १ आणि २ जूनच्या मध्यरात्री १२.२० ते सकाळी ६.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द, तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात येणार आहेत.

२ जून रोजी रद्द केलेल्या गाड्या

  • विरारहून पहाटे ५.३५ वाजता सुटणारी विरार-डहाणू रोड लोकल
  • डहाणू रोडवरून सकाळी ७.१० वाजता सुटणारी डहाणू रोड – चर्चगेट लोकल
  • विरार - सांजन मेमू
  • ट्रेन क्रमांक १९००३ वांद्रे टर्मिनस - भुसावळ एक्स्प्रेस
  • ट्रेन क्रमांक १९००४ भुसावळ - वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस
  • २ जून रोजी पहाटे ५.२५ वाजता डहाणू रोडवरून सुटणारी डहाणू रोड-पनवेल गाडी डहाणू रोड आणि वसई रोड स्थानकांदरम्यान अंशतः रद्द केली जाईल. मात्र, ती वसई रोड आणि पनवेल स्थानकांदरम्यान धावेल.


मध्य रेल्वे प्रशासन मुंबईच्या नागरिकांचा अंत बघत आहे. भारताचा आर्थिक कणा असलेल्या मुंबईच्या लोकल या रक्तवाहिन्या आहेत. मुंबईतील अतिशय महत्त्वाची जमीन रेल्वे प्रशासनाकडे आहे. याचा गैरफायदा रेल्वे प्रशासन घेत आहे. ठाणे स्टेशनचे विकेंद्रीकरण करण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित कळवा ऐरोली लिंकचे काम पूर्ण केल्यास ठाण्याच्या १०-११ फालाटांची गरजच भासणार नाही आहे. मुंबईसाठी लोकल, मेट्रो, बससेवा, एसटी, मोनोरेल यांचे एकच प्राधिकरण हवे आणि मुंबई लोकल ही भारतीय रेल्वेपासून वेगळी झाल्याशिवाय मुंबईकरांचे हाल संपणार नाहीत.
- सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ

एका दिवसात दहा लोकल ट्रेन रद्द झाल्या तरी प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. मग ९३० फेऱ्या रद्द म्हणजे काय भयानक परिस्थिती होईल. या तीन दिवसांत मेगाब्लॉकसाठी इतर वाहतूक सोयीसुविधा पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे? याचा उल्लेख दिसत नाही. रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता, चर्चा न करता मेगाब्लॉक घेतला आहे. यामुळे विशेष रजा घोषित करायला हवी.
- लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना

ज्या गतीने हे काम सुरू आहे ते बघता (दोन महिन्यांवर आलेल्या) पावसाळ्यापूर्वी फलाट रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले तरी रुंद केलेल्या भागावर छप्पर तयार करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण  होण्याची शक्यता नाही, अशा परिस्थितीत प्रवाशांचे हाल होतील. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काम केले पाहिजे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ

नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याकरिता विशेष लोकल सोडण्यात याव्यात. तसेच त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत; त्या अडचणी दूर करण्यासाठी एक रेल्वे हेल्पलाइन नंबर आहे तो जाहीर करावा. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे.
- राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ

मुंबईत जोपर्यंत सर्वच गर्दीच्या ठिकाणचे अरुंद पादचारी  पूल रुंद होत नाहीत व जास्तीत जास्त सरकते जिने लागत नाहीत तोपर्यंत प्रवाशांना गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीचा सामना करावाच लागणार. रेल्वे वाढविल्यास हे प्रश्न प्रामुख्याने रेल्वेला सोडवावे लागणार. बऱ्याच ठिकाणी सरकते जिने अभ्यास न करताच लावले गेलेले आहेत. त्यात आता ब्लॉक लोकांना त्रास देणार आहे.
- दिनेश हळदणकर, रेल्वेप्रवासी

दीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून या सुधारणा केल्या जात आहेत. कार्यालयांनी मुंबईकरांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी. रेल्वे प्रत्येक रेल्वेस्थानकांवर ब्लॉकची घोषणा करावी. जेणेकरून प्रवाशांना याची माहिती होईल.
- केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी

Web Title: Central Railway sees end of tolerance as Three-day 'jumbo block' angers travel associations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.